हिरकणी गड उतार झाली….
पहाटे डोईवर दोन दुधाच्या घागरी घेऊन ती गड चढली होती. सर्व दूध विकून आता परती च्या वाटेला लागली होती . तिला घाई होती. तिच तान्ह लेकरू उपाशी असेल. पावलं पटापट अंतर कापत होती. पण आज नशीब सोबत नव्हत तिच्या. गडाचे दरवाजे बंद झाले होते. विनवण्या करून करून ती मेटाकुटीला आली.. काय कराव उमजेना. गडाची दार कुणी उघडेना. आपलं इथं काही चालणार नाही याचा अंदाज तिला आला. आता थांबणे नाही आणि विनवणे तर नाहीच नाही. ती मार्ग शोधू लागली. अंधार वाढत चालला होता. आजूबाजूची झाड अक्राळ विक्राळ राक्षसाप्रमाणे वाटत होती. तेव्हड्यात एक अरुंद पायवाट दिसली तिला. तिथून रास्ता खाली जात असावा. पण फारच कठीण अश्या कड्या ची उतरती वाट होती ती. मागचा पुढचा विचार न करता अंधारात झोकून दिल तिनं स्वतः ला. काटेरी झुडपांचे ओरखडे बसत होते अंगावर. वाट निसरडी होती. एक जरी पाऊल वाकडं पडलं तरी कपाळमोक्ष निश्चित होता. पण डोळ्यासमोर एकाच लक्ष आपल उपाशी तान्ह बाळ …..
अखेर जिवावर उदार होऊन हिरकणी गड उतार झाली.
पहाटे पाच ला सुरु झालेला तिचा दिवस. सर्वांचा चहा नास्ता डबे आणि बरेच काही करून तिने पळत पळत ८.१० ची फास्ट लोकल मिळवलीच. दिवसभर फाईलींचे गट्ठे उपसले … दिवस मावळतीला लागला पण काम काही संपेना. शेवटची फाईल तपासून ती भराभर पावल टाकत स्टेशन कडे निघाली. वाटेत उद्याची भाजी आणि थोडा बाजार हाट हे सुद्धा लगेहात उरकले. धक्कबुक्क्यांचा , अचकट विचकट नजरेचा स्पर्शाचा राक्षस टाळत ती लोंढ्या बरोबर पुढे पुढे जात राहिली. नेहिमीची डोंबिवली फास्ट मिळवली ….आणि
….हूश्शह्ह … हिरकणी गड उतार झालीच …. पिल्लं वाट पहात होती घरी…
मीटिंग संपली, सर्वांशी हस्तांदोलन झाले, तिनं लॅपटॉप बंद केला, projector बंद केला. कॉन्फेरंस रूम मधले लाईट बंद झाले. सर्वांचा मोर्चा डाईनिंग हॉल कडे वळला. फ़ेसाळत्या ग्लासांची किणकिण झाली … मल्टि कुझीन जेवणाची टेबलं भरली … बऱ्याच जणांनी तिच कौतूक केल. ..बरीच जणं तिचं कर्तृत्त्व पाहून जळफळलें सुद्धा. हिला खाली कस पाडायचं ह्याचे प्लांनिंग पण झाले.. … पण तिच लक्ष घडाळ्यात होतं. ९ चं विमान होतं तिचं . ती कशीबशी सर्वाना चुकवून cab मध्ये बसली. ट्राफिक , गर्दी , गाड्या सर्वाना चुकवत ती कशी बशी airport ला पोचली . मुलं घरी काय करत असतील , अभ्यास झाला असेल का, प्रोजेक्ट संपवल असेल का ? अनेक विचार . विमान आकाशात उंच उडालं . दोन तासात मुंबईला पोचल……
हिरकणी गड उतार झाली…. तिची लेकरं एव्हाना वाट पाहून झोपली …
काळ बदलला , जागा बदलल्या , आव्हानं बदलली … पण कधी जीवाचा आटापिटा करून किंवा उदार होऊन हिरकणी गड उतार होतच आहे…..
स्रोत: फेसबुक
लेखक: अनामिक