नवरा आणि नारळ

नवरा आणि नारळ कसे निघतील ते नशीबच जाणे असं आजी म्हणायची . बरं , घेताना फोडूनही बघता येत नाही . दोन्हीही कसेही निघाले तरी ” पदरी पडले , पवित्र झाले “. दोघांनाही देवघरात स्थान , दोघेही पुज्य .

पार्ल्यातल्या फिश मार्केट बाहेर मद्रासीअण्णा च्या गादीवर नारळ रचून ठेवलेले असायचे . हल्ली ऑन लाईन साईट वर सगळ्या किमतीचे नवरे असेच रचून ठेवलेले असतात. मी सारस्वत , लाखेच्या कुर्ल्या , सफेद पाण्याचं पापलेट , थडथडीत बांगडे ,खाडीची कोलंबी एका क्षणात ओळखतो . पण नारळ म्हटलं कि मला धडधडतं . चांगला ओळखायचा कसा ?

मी उगाचच कानाजवळ नेऊन हलवून वगैरे बघत असे . अण्णाला कळायचं हे गि-हाईक नवीन आहे . तो आपली जाड पितळी आंगठी दोन तीन नारळावर टांग टांग वाजवून हातात एक नारळ द्यायचा . ये, लो ! म्हणायचा . मी विचारायचो “” खवट “” निकलेगा तो ? तो म्हणायचा तुम्हारा नसीब !!

आजी म्हणायची नारळ गोड निघाला तर माशाची आमटी , सोलकढी , खोबर्याच्या वड्या आणि काय काय !
खवट निघाला तर पाण्यात उकळून वर तरंगणारं कच्च तेल बाजूला घ्यायचं . घाणीवरचं असतं तसं .कापलं, भाजलं ,ओठ फुटले, टाचाना भेगा पडल्या , केसांना लावलं , थंडीत चोळलं , दुखऱ्या कानात टाकलं , उत्तम घरगुती औषध . किती उपयोगी किती बहुगुणी !!

थोडक्यात काय ,नवरा काय ? नारळ काय ? गोड़ निघाला तर नशीब , खवट निघाला तर उपयोगी , हे कोकणी तत्त्वज्ञान.

ह्याला जीवन ऐसे नाव !!

Nishant Vaity

I am Software Engineer, Technology Mentor & Entrepreneur. I am passionate about the technologies I use and always eager to share & learn more from that passion. I am an experienced Software Engineer with 8+ years of experience in coding high-traffic websites. Proficient in HTML, JavaScript, jQuery, CSS with LAMP / MAMP / WAMP Stack. Contributor for WordPress open source plugins and Translator (Marathi) for WordPress 4.5.x.

%d bloggers like this: