बुडव्या (Budavya)

मे महिन्याचा शेवटचा आठवडा. मी बरोबर लक्षात ठेवलंय. तीन वर्ष सलग… तीन जणं बुडालीयेत. आख्खी सोसायटी तीन वेळा आक्रोशी रडलीये. तीनही पोरंच… आठ दहा वर्षाची असतील. चांगली पोहणारी. त्यांच्या आईबापाकडे बघवत नव्हतं. असं कसं झालं ? कशाला विचारताय ? ऊत्तर नसलेला प्रश्न.

पूल असणार्या मोजक्या सोसायट्या, त्यापैकी आमची एक. टीचभर नाही, चांगला लांबलचक पूल आहे आमचा,खोलीही चांगली आहे, अगदी पंधरा वीस फुटापर्यंत. चांगला मेन्टेन केलेला; आरस्पानी, नितळ तळ दाखवणारं पाणी. आलम दुनिया या पूलपायी आम्हाला पाण्यात बघायची. आणि आता त्या पूलचंच शापित तळं झालेलं…. गूढ गहिरं पाणी… नको रे बाबा…

लाईफ गार्ड वगैरे कधी नव्हतेच. दहा बारा वर्ष झालीयेत सोसायटी बांधून. आईबापच लक्ष ठेवायचे पोरांवर. पोरं पोहायला शिकली की आपापली पोहायची, नुसता धुडगूस. दर वर्षी ट्युबवाली नवी पलटण असायचीच. हळूहळू तीही शिकायची पोहायला. कुणीतरी पट्टीचा पोहणारा असायचाच दरवेळी. तो सांभाळून घ्यायचा.

ईतक्या वर्षात काही झालं नव्हतं. हे आत्ताच दोन तीन वर्षांपासून सुरू झालंय. चेअरमन म्हणतायेत, यावेळी पूल ऊघडायचाच नाही. विषाची परीक्षा नकोच.

खरं सांगू ? मला वाटतं हा फक्त योगायोग असावा. असं काही नसतंच. जस्ट एन असिसिडेन्ट जास्त काही नाही. तसं मला काही फरक पडत नाही. नाही डुंबायला मिळालं तरी चालतं. मी पट्टीचा पोहणारा आहे. मेडल्सचा ढिगारा पडलाय घरी. धरमतर ते गेटवे पण पोहून झालंय. सगळी हौस फिटलीय.

पण यावर्षी कहर झालाय. ऊन्हानं नुस्ता जाळ काढलाय. परवाचीच गोष्ट, ऑफिसमधुन घरी पोचतच होतो, गेटवरच अडलो. सोसायटीतली सगळी पिल्लावळ “दादा, फक्त एकच तास, तू पाण्यात असलास, की कुणी नाही म्हणणार नाही.” “बरं बाबांनो. उद्या संध्याकाळी सहा ते सात. पूलवर भेटू.”

मी बरोबर म्हणून आईबाप निर्धास्त. चेअरमनसाहेबांनीही आडकाठी केली नाही. दहा.. अकरा… बारा. बरोब्बर बारा डोकी. पट्टीची पोहणारी सात. हौशी कलाकार पाच. चार फुटाच्या मार्कवर आडवी दोरीच बांधून घेतली. हौशी नवशिक्यांना म्हणलं, “ही तुमची लक्ष्मणरेषा. काहिही झाले तरी ओलांडायची नाही.” एवढीच अट. ऐकलं बुवा पोरांनी.

या डुम्बा डुम्बा. पावणेसात वाजत आलेले. तो पाऊणतास. आख्खा ऊन्हाळा गार करून गेला. नवशिक्यांना पाण्याबाहेर काढलं. आईबापाच्या ताब्यात दिलं. आता आम्ही आठ. पट्टीचे. पोरं म्हणाली, “जंप मारून दाखव ना..” मला हरभर्याच्या झाडावर चढवलं. मी जिना चढून प्लॅटफाॅर्मवर. हुप्पा.. हुय्या… धप्पाक मुटका.. आभाळापर्यंत पाणी गेलेलं. पूलाच्या पोटात खड्डा. कानठळी आवाज. मायक्रोसेकंदात सगळ शांत. पोरांची भिरभिरती नजर. तळ खरवडणारी. मी वर आलोच नाही.. ओय छड्डो यारा.. आ गया .. पाण्याखालून. दुसर्या टोकापर्यंत. हळूच बाहेर. धपांडीईष्टाॅप खेळत असल्यासारखा. पोरं गार पडलेली. मीही पेटलेलो..

“आता सूर मारून दाखवतो.” पटाटा जिना चढून वरती. मस्त सूर मारला. पाणी चिरत तळाशी. तळाला हात टेकवला. माझी नेहमीची सवय. तो स्पर्श. डोळे ऊघडेच होते. तो दिसला. साडेचार फुट असेल. तळाशी निवांत झोपलेला. पाय पोटाशी घेवून. कुरळे केस. गोल चेहरा. निळे लकाकी डोळे. निरागस भाव. त्याचं ते तिथं असणं. मला दिसणं. माझा श्वास अडकला. जाम टरकलो. ओल्या पाण्यात घाम फुटला. कसाबसा वर पोचलो.

काही तरी गूढ. विचित्र. धोक्याची घंटा वाजलेली.

“आधी पाण्याबाहेर पडा.” जीव खावून ओरडलो. पोरं घाबरून पाण्याबाहेर.

काऊंटींग सुरू केलं. पाच.. सहा… सात… आठवा कुठेय ?
तेवढ्यात धप्प आवाज. आठव्या आगाऊ पोट्ट्यानं पाण्यात सूर मारलेला. जिवाच्या आकांतानं मी पाण्यात ऊडी घेतली. तळ खरवडणारी माझी नजर. पाण्याखालीही मी व्यवस्थित बघू शकतो. तो तिथंच होता. पण आता जागा झालेला.

ते आठवं पोट्टं… खाली खाली. त्याच्यापर्यंत पोचलेलं. हात मारून वर जायला धडपडत होतं. त्याच्या हाती लागलेलं. त्याच्या ईवलाश्या हातात जबरदस्त ताकद. झोपी गेलेला तो. आता जागा झालेला. मला दिसतंय. आठव्या पोट्ट्याचा दमसास संपत चाललेला. एक सेकंद जरी ऊशीर झाला ना.. त्याचा वरच्या दिशेने प्रवास सुरू होणार.

“ए सोड त्याला…”

खोल पाण्यात माझा आवाज घुमला. त्यानं मान वळवली. स्लो मोशनमधे माझ्याकडे बघितलं. त्याची ती नजर. फ्रीज करणारी. फुलस्टाॅप देणारी.

“ठीकेय… त्याला सोडतो.. तुला पकडतो.”

आठवा पोट्टा पटकन् वर सटकला. लाईटनींग स्पीडनं तो माझ्याजवळ. मी जीव खावून वर जाण्यासाठी धडपडतोय.. धरलाच त्यानं. त्याचा तो ईवलासा हात. माझा एक पाय पकडलाच.

जोर लगा के हैया… काही ऊपोग नाही. तो जिंकला. मी हरलो.

पाच मिनटं.. पाच मिनटं त्यानं मला पाण्याखाली दाबून ठेवला. आता मी निवांत. काहीच घाई नव्हती. नश्वर शरीर. आत्मा अमर. सगळं पटायला लागलेलं..

त्याच्याशी निवांत बोलू लागलो.

“कारे बाबा ? का गिळतोयस असा लोकांना ?”

तीस वर्षांपूर्वी. ईथंच मारून गाडलं होतं मला. पैशापायी खून केला माझा. तुमची सोसायटी झाली. तुमचा पूल नेमका इथंच. तरीही मी झोपूनच होतं. तीन वर्षांपूर्वी एकानं सूर मारला. तो थेट माझ्या अंगावर. जाग आली. गुस्सा आला. मग काय खेचला त्याला.

आता दर वर्षी एक, “बरं वाटतं” मी निशब्द.

“तू येडा आहेस. गप गुमान वर जायचं. ऊगा माझ्या नादी लागलास. फुकट बुडालास.”

तोवर.. वर.. हल्लकल्लोळ. आठवा पोट्टा. जीव खावून बोंबलत होता. सोसायटी गोळा झालेली. दोघा चौघांनी ऊड्या मारलेल्या. मला वर काढलेलं. पंपीग चाललेलं. पाणी बाहेर काढतायेत.

मी इथनं सगळं बघतोय. सी सी टीव्ही बघितल्यासारखं.. हेल्पलेस…

अचानक… मी डोळे ऊघडतो. जीवात जीव आलेला.

डोळ्याच्या एका कोपर्यातून दूर जाणारा तो दिसतो.

“जरा मज्जा केली. हमारा भी ऊसूल है बाबा. वाचवणार्याला नाही बुडवत आम्ही. चल. आता नाही थांबत इथं. बाय..”

मी पुन्हा डोळे मिटले…. आनंदानं…

दहा वर्ष झालीयेत या गोष्टीला. मी पूलात पाय नाही ठेवला. पूल सताड ऊघडाय. पोरं डुंबतायेत. आता काही त्रास नाही .

स्कोर शून्य. तरीही.. मी घाबरतो.
बुडव्या खाली माझी वाट बघत असला तर..??

लेखक: कौस्तुभ केळकर नगरवाला

Nishant Vaity

I am Software Engineer, Technology Mentor & Entrepreneur. I am passionate about the technologies I use and always eager to share & learn more from that passion. I am an experienced Software Engineer with 8+ years of experience in coding high-traffic websites. Proficient in HTML, JavaScript, jQuery, CSS with LAMP / MAMP / WAMP Stack. Contributor for WordPress open source plugins and Translator (Marathi) for WordPress 4.5.x.

%d bloggers like this: