आसावरी

रात्रीच्या अडीच वाजता दाराची बेल वाजली नी आसावरी खडबडून जागी झाली. या अशावेळी वाजलेली दारावरची बेल असो की फोनची रींग, त्या निरव शांततेत त्यांच्याएव्हढीच जोरात नी कर्कश्य चुकचुकते मनातुन शंकेची पाल ही. नात्यातली… बिल्डिंगमभली सगळी म्हातारी मंडळी क्षणार्धात आसावरीच्या मनातून हजेरी लावत गोळा झाली… ‘छे, काहीतरीच’ असं मनाशी म्हणत, तीने डोकं हलवून सगळ्यांना आदरपुर्वक परत पाठवलं.

या एव्हढ्यावेळेत दुसर्‍यांदा काही बेल वाजली नव्हती… तीलाच आश्चर्य वाटलं ह्या गोष्टीचं नी तीने अमरकडे पाहिलं… तो पाठ करुन तीच्याकडे शांत झोपला होता. ‘म्हणजे बेल वाजलीच नव्हती? मला भास झाला? पण कसं शक्य आहे हे? त्याआधिच दहा मिनिटं मी बाथरुमसाठी ऊठले होते… किचनमध्ये जाऊन पाणी पिऊन आले होते… झोपेचा दाट अंमल नक्कीच नव्हता माझ्यावर की मला भास होईल’. हे सगळं विचारचक्र मनातून चालू असतांनाच तीला बाहेरच्या खोलीतून कोणाच्यातरी कुजबुजण्याचा आवाज आला नी पाठोपाठ कोणाच्यातरी अस्पष्ट अशा हुंदक्यांचाही.

आता मात्र ती चांगलीच घाबरली… आधाराकरीता तीने अमर कडे पाहिलं, पण तो त्याच पोझिशनमध्ये आत्ताही झोपला होता… तीच्याकडे पाठ करुन. आसावरीने भिऊन ऊशी तोंडावर घेतली नी झोपली ती, अमरच्या अजुन जरा जवळ सरकून पण त्याला न खेटता… त्यालाच आवडलं नसतं ते. ह्याचीच वाट पहात असल्यासारखा अमर झप्पकन वळला नी त्याने ती ऊशी आसावरीच्या तोंडावर जोराने दाबली… मगाशी हळूच किल्लीने दरवाजा ऊघडून घरात शिरलेली… ऊगीच कुजबुज करणारी… खोटे हुंदके देणारी सेजलही आत आली… तीने पाय पकडून ठेवले आसावरीचे… नाजुक आसावरी तडफडत होती… गुदमरत होती. तेव्हढ्यात तीच्या तोंडावरची ऊशी बाजुला झाली… ती जरा भानावर येतेय, नेमकं काय होतंय आपल्याबरोबर हे कळतय… तोच केस मोकळे सोडलेल्या सेजलने जाड आवाजात तीला हाक मारत, तीच्या अक्षरशः अंगावरच ऊडी मारली… आजुबाजुचं पुसटसं दिसणार्‍या त्या अंधारात, क्षणभरच झटपटला तो एकटा जीव नी सारं शांत झालं… हो आसावरी गेली होती. अमरने दीवा लावला… सेजलने ऊठून केस बांधले स्वतःचे… दोघं जवळ आली एकमेकांच्या… ऊभी राहीली बघत आसावरीकडे… तीचे डोळे सताड ऊघडे होते… चेहरा पांढरा फटक पडलेला… शरीर अस्ताव्यस्त पण निपचीत झालेलं… आसावरी गेली होती… तीव्र हृदयझटक्याने… जागीच… अमरचा प्लॅन यशस्वी ठरला होता.

मागल्याच महिन्यात आसावरीची तब्येत बिघडली असतांना, करण्यात आलेल्या सगळ्या चाचण्यांतून तीच्या जन्मतःच कमकुवत असलेल्या हृदयाचं सत्य बाहेर आलं होतं… डाॅक्टरानी स्पष्ट सांगितलं होतं अमरला की ह्याना या अवस्थेत, कुठलाही जबर मानसिक धक्का बसता ऊपयोगी नाही. आणि हेच नेमकं अमरच्या पथ्यावर पडलं होतं… कधी डोअर बेल वाजल्याचे, कधी दरवाजावरच्या जोरजोरात थापांचे तर कधी फोनच्या रींगचे रात्री अपरात्रीचे आवाजही गेल्या महिन्याभरापासूनच तर चालू झालेले होते. अमरने त्याची प्रेयसी नी त्याच्या बिल्डींगच्या वाॅचमनला हाताशी धरुन हा प्लॅन बनवला होता… सतत दाखवलेल्या अनामिक भीतीने आसावरीवर नक्कीच परिणाम होईल, नी ती तीच्या त्या कमकुवत हृदयाने फार काळ तग धरु शकणार नाही… हे अमरने जाणलं होतं…आणि अगदी तस्सच झालंही होतं. अनैसर्गीक वातावरण निर्मिती करुन अमरने आसावरीला नैसर्गीक मृत्यू देऊ केला होता… तीच्या ठरलेल्या वेळेआधीच खरंतर.

कोणालाही कसलाही संशय आला नव्हता… सगळी अंतिम क्रियाकर्म यथासांग पार पडली होती. वाॅचमनला त्याने अपरात्री सेजलला रजिस्टरमध्ये नोंद न करता येऊ देण्याचे नी ती येता – जाता तेवढ्यावेळेपुरते सी. सी. टीव्ही बंद ठेवण्याचे, ठरलेले एक लाख दुसर्‍याच दिवशी मिळाले होते… तर पंधरा दिवसातच सेजल अमरच्या घरी तीच्या सामानासकट राहायलाही आली होती… वर्षभर लीव्ह-ईन मध्ये राहणार होती ती दोघं… पुरेपूर ऊपभोग घेणार होती आयुष्याचा.

दोन महिने ऊलटून गेले होते मध्यंतरी… अमर नी सेजल नुकतीच मालदिव्ज ट्रीप करुन आले होते… एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते… एकंदरीत सगळं स्वप्नवत चाललं होतं. आणि… रात्रीच्या बाराच्या सुमारास जोरात ‘धडाम्मssss’ करुन आवाज झाला… सगळी लोकं गॅलरीत जमली तर काही खाली गोळा झाली… वाॅचमनचा चिंधड्या ऊडालेला… अक्षरशः फुटलेला देह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता… सात मजली बिल्डींगच्या गच्चीवरुन ऊडी जरी मारली तरी देह एव्हढा कसा ऊधडून येऊ शकतो? अगदी ऊशीचा अभ्रा टराटरा फाडून, कापुस ओढून ओढून बाहेर काढल्यासारखा… मुद्दामहून ईतस्ततः पसरवल्यासारखा… जसं कोणीतरी त्या शरीराला पार ऊसवून छीन्न – विछीन्न करुन टाकलं असावं. सगळे पोलिसी सोपस्कार पार पडता पडता सकाळचे पाच वाजून गेले. अमर नी सेजलला विशेष धक्का बसलेला होता झाल्या प्रकाराचा… पण एकीकडे अमरला जरा मोकळंही वाटत होतं… त्याच्या गुन्ह्यातला एक भागिदार, जो कधिही फीरु शकला असता… तोच आता राहिला नव्हता.

ऑलरेडी जागेपणीच ऊगवलेला तो दिवस मग वार्‍याच्या वेगात मावळलाही… रात्रीच्या शो ची दोन तिकिटं काढली होती अमरने नी नंतर बाहेरच डिनर घ्यायचा प्लॅनही होता. त्या वाॅचमनचा मृत्यू विसरली होती दोघही आत्तापर्यंत… अमरने गाडी त्याच्या पार्कींग लाॅटमध्ये पार्क केली… नी दोघं हातात हात घालुनच लीफ्टमध्ये शिरले… सहाव्या मजल्यावर लीफ्ट थांबली… लाॅबीमध्येच अमरला तो प्रचंड ओळखीचा गंध जाणवला आजुबाजुला… आणि सर्रर्रकन काटा आला त्याच्या अंगावर… हो, हा त्याच डिओचा सुवास होता… यार्डलीचा जो आसावरी लावत असे. हे काहिच न जाणवलेल्या सेजलने तोपर्यंत दरवाजा ऊघडला होता… दिवा लावला आणि दोघही थिजून जागच्या जागी ऊभी राहिली… गोठून गेलेल्या गात्रांनी अविचल. ती बसली होती समोरच आरामखुर्चीवर झोके घेत… वटारलेले, त्यांच्यावर रोखलेले, उघडझाप न होणारे ते डोळे नी त्यांतून वाहणारी ती थंडगार नजर… विस्कटून थोडे तोंडावर आलेले मोकळे सोडलेले केस… पांढर फटक तोंड आणि पाठोपाठ आलेला तो जाड नी कमालीचा भेसुर आवाज… “या… आलात, तुमचीच वाट पाहत होते मी… गेले दोन महिने… कधी एकदाची मी दिसतेय तुम्हाला, असं झालं होतं मला… काल त्या वाॅचमनला दिसले मी नी आज तुम्हाला”. शेवटच्या वाक्याला खुर्चीवरुन ऊठत ती त्यांच्याकडे सरसावली होती… आणि आवाजानेही चढण्याची कमाल मर्यादा ओलांडली होती.

आज पुन्हा गॅलेक्सी अपार्टमेन्टमध्ये पोलिस आले होते… जमा लोकांच्या गर्दीतुन दोन पुरते ऊधडलेले, जागोजागी ऊसवलेले देह गोळा करुन अँब्युलन्समध्ये चढवण्यात येत होते…

६०१ चं दार बाहेरुन पोलिसांनी सील ठोकून बंद केलं होतं… आणि आत गर्द काळोखात आरामखुर्चीच्या झोक्यांचा आवाज येत होता… शांत, एकाच लयीतला.

मुळ लेखक: सचिन देशपांडे

स्रोत : Facebook

%d bloggers like this: